Home health सर्दी-तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले

सर्दी-तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले

0
सर्दी-तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून देशात इन्फ्ल्युएन्झाचा (H3N2) संसर्ग वाढत आहे. कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या ‘इन्फ्ल्युएन्झा’ने राज्यात दोन बळी घेतल्यानंतर धोका वाढला असताना मुंबईत पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सर्दी-तापाच्या रुग्णांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. तर नवी मुंबई शहरात ही महापालिकेच्या बाह्यरुग्णांत ५० टक्के रुग्ण ताप, सर्दी, खोकल्याचे आढळत आहेत. यामध्ये ५ वर्षाखालील लहान मुलांमध्ये प्रमाण जास्त आहे.
एकीकडे मुंबईकर वाढलेल्या प्रदूषणात उकाड्याने हैराण झाले असताना तापाचे रुग्णही वाढू लागल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येत लहान मुले, वृद्ध आणि सहव्याधी असणा-यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
वातावरणातील उष्ण-दमट हवामान आणि वायू प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरपासून ताप विशेषतः सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. पालिका तसेच खासगी रुग्णालयात ताप, सर्दी, खोकल्याने जडलेल्या रुग्णांत वाढ झाल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले प्रदूषण आणि वातावरणात अचानक होणा-या बदलांमुळे श्वसनाचे आजार असलेल्यांना ‘व्हायरल इन्फेक्शन’ लवकर होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सर्दी-तापाच्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहता लक्षणे असलेल्यांनी, सहव्याधी असणा-यांनी आणि श्वसनाचे आजार असणा-यांनी काळजी घ्यावी. गरम पाणी पिणे, मास्क वापरणे, स्वच्छता राखणे फायद्याचे ठरेल, असा सल्ला शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠