Home Politics भारत जोडो’ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत जोडो’ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
भारत जोडो’ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई :- मणिपूरवरून सुरू झालेली काँग्रेस खासदार राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा साठाव्या दिवशी शनिवारी मुंबईत दाखल झाली. मुलंड येथील एलबीएस रोड चेक नाक्यावरून या यात्रेचा मुंबईत प्रवेश झाला. त्यानंतर पुढे याच रस्त्याने सायनवरून ही यात्रा धारावीत दाखल झाली. मुंबईत प्रवेश केलेल्या यात्रेत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या यात्रेत सहभागी झाल्या.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत राहुल गांधींच्या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा मुंबईत जास्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत होते. मुंबईतील यात्रेत रस्त्याच्या दुतर्फा लोक या यात्रेच्या स्वागतासाठी उभे होते. यात्रे दरम्यान लोक राहुल गांधींना उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते, त्यांच्याबरोबर फोटो, सेल्फी काढण्यासाठी आटापिटा करत होते. धारावीत या यात्रेचे जोरदार स्वागत झाले. धारावीत यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. धारावीत सभा झाल्यानंतर राहुल गांधींना चैत्यभूमीकडे जायचे होते, मात्र या गर्दीतून त्यांची गाडी काढायला पोलिसांना कसरत करावी लागली.
मणिपूरमध्ये भाजपने नागरी युद्धाचे वातावरण तयार केले आहे, त्यामुळे आपण मणिपूरपासून भारत न्याय जोडो यात्रेची सुरुवात केली. तर मुंबईतील धारावी ही देशातील कौशल्याची राजधानी आहे, त्यामुळे इथे आपण या यात्रेची सांगता करत आहोत, असे सांगत मी सुरू केलेली लढाई ही देशातील दलालांविरोधातील असल्याचे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या शेवटच्या दिवशी धारावीत घेतलेल्या चौकसभेत बोलताना सांगितले. धारावीतील लढाई ही कौशल्य आणि दलालांमधील लढाई आहे, धारावी आणि अदानी यांच्यातील लढाई आहे. त्यामुळे यात्रेत आम्ही न्याय शब्द जोडल्याचे राहुल गांधींनी यावेळी बोलताना सांगितले.
मागील ६० दिवस राहुल गांधींनी देशाच्या विविध भागात ही यात्रा केली, प्रत्येक ठिकाणी त्यांनी चौकसभा घेतल्या, तर धारावीत शेवटची चौकसभा घेतली. संपूर्ण देशात गरीब, शेतकरी, मजुरांवर अन्याय होत आहे. सगळीकडे अदानी, अंबानी ही दोनच नावे दिसतात. धारावीची जमीन तुमची आहे, ती आता दलाल तुमच्यापासून हिसकावू पाहत आहेत आणि त्यांच्या मागे देशाचा पंतप्रधान असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
या देशातील सरकारकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, चंदामामा या शक्ती आहेत. त्याच्या आधारे जगातील सर्वांत मोठे खंडणीचे रॅकेट देशातील सरकार चालवत आहे. आधी ईडीचे लोक कंपनीवर धाड टाकतात आणि त्यानंतर तीच कंपनी भाजपला कोट्यवधी रुपये बॉण्डच्या रूपाने देते आणि मग ईडी चौकशी हळूहळू थांबते.
दुसरा प्रकार कंपनीकडे जातात, मोठमोठे प्रकल्प देतात आणि त्यातील नफ्याची टक्केवारी भाजपच्या बॉण्डमध्ये दिली जाते.
तिसरा प्रकार थेट कंपनीकडून हप्ता घेतला जातो. हे तीन प्रकार आहेत मोदींच्या भ्रष्टाचाराचे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी या सभेत केली.
या देशाची खरी परिस्थिती तुमच्यासमोर आणण्याासाठी राहुल गांधींनी ही यात्रा केली आहे. ती तुम्हाला जागरूक करण्यासाठी केलेली यात्रा आहे. मागील दहा वर्षांत आपल्या जगण्यातील संघर्षात काय बदल झाला? महागाई, बेरोजगारी कमी झाली का? हे सरकार दोन स्तरावर चालले आहे, एका स्तरावर मोठमोठे कार्यक्रम केले जात आहेत, मोठी कामे झाल्याचे दाखवले जात आहे आणि दुसऱ्या स्तरावर सामान्यांचे कंबरडे मोडणारे निर्णय घेतले जात आहेत. दुसऱ्या बाजूला उद्योगपतींना पूर्ण देशाची संपत्ती दिली जात आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अनुभवनातून स्वतः जागरूक व्हायला हवे, त्यातून तुमच्या लक्षात येईल हे सरकार तुमच्याविरोधात काम करत आहे. त्यामुळे ही न्याय यात्रा तुमच्या हक्काच्या लढाईसाठी आहे असे प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या म्हणाल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠