Home Farmer विचित्र हवामानाचा आंबा पिकाला फटका

विचित्र हवामानाचा आंबा पिकाला फटका

0
विचित्र हवामानाचा आंबा पिकाला फटका

रत्नागिरी :- दिवसा कडकडीत ऊन आणि रात्री गारवा या विचित्र हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असून शेंगदाणा आणि सुपारीएवढी कैरी गळून जात आहे. दुसऱ्‍या, तिसऱ्‍या टप्प्यातील उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. कैरी गळून जाण्याबरोबरच फुलकिडी, तुडतुड्याचा मोठ्याप्रमाणात हल्ला होत आहे. त्यावर नियंत्रण मिळवताना बागायतदारांना कसरत करावी लागत आहे.
हंगामाच्या आरंभाला अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची निराशा झाली होती. त्यामधून वाचलेला आंबा फेब्रुवारी महिन्यात वाशीसह विविध बाजारपेठेमध्ये दाखल होऊ लागला आहे. जानेवारी महिन्यात, पडलेल्या बोचऱ्‍या थंडीने बागायतदारांना दिलासा मिळेल, असे चित्र होते. पण थंडीचा कालावधी लांबल्यामुळे मोहोर प्रचंड प्रमाणात आला. त्यामध्ये नर फुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे फळधारणा होऊ शकलेली नाही. परिणामी दुसऱ्‍या, तिसऱ्‍या आणि त्यानंतर येणाऱ्‍या मोहोरामधून किती उत्पादन मिळेल, याबाबत बागायतदारांमध्ये साशंकता होत आहेत. गेल्या चार दिवसांत वातावरण बदलू लागले असून उन्हाचा कडाका वाढलेला आहे.
दिवसा पारा ३४ अंशापर्यंत गेला असून किमान तापमान २० अंशाखाली आहे. रात्रीच्यावेळी गार वारे वाहत आहेत. दिवसा ऊन आणि रात्री गारवा या परिस्थितीचा फटका शेंगदाणा किंवा सुपारीएवढ्या आकाराच्या कैरीला बसला आहे. उष्म्यामुळे कैरी भाजून तिची गळ होत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातून अपेक्षित उत्पादन मिळेल, या आशेने बघणाऱ्‍या बागायतदाराची चिंता वाढली आहे. यंदाच्या हंगामात उत्पादनात मोठी घट होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. थंडीमुळे काही भागातील बागांमध्ये कैरीच्या बाजूने मोहोर येऊ लागला आहे.
तसेच वातावरणातील बदलांमुळे फुलकिडी, तुडतुड्यांचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यावर नियंत्रण मिळवता येत नसल्याने बागायतदारांना फवारण्यांवर फवारण्या कराव्या लागत आहे. कोकण कृषी विद्यापीठाकडून यावर उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी गेल्या आठ दिवसांमध्ये बागायतदारांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠